सध्या अनेकांना लगेच श्रीमंत व्हायचे आहे. असे असताना झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी ऑनलाइन रमी सर्कल गेम खेळण्याचा नाद लागला आणि नंतर हा गेम खेळताना पैसे गमावून बसला. अशा अनेक बातम्या आपण बघत असतो.
आता अशीच एक बातमी समोर आली आहे. यामुळे तरुणावर काय वेळ आलीय हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. एका तरुणाने अशा प्रकारे गेम्स खेळून तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी चक्क एका तरुणाने वयोवृद्ध महिलेला लुटले आहे. मात्र त्याला पकडून पोलिसांकडे देण्यात आले.
नितीन ठाकरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरट्याला पकडणारा तरुण सर्वेश राऊत याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या ऑनलाइन गेमचा सुळसुळाट सुरू आहे. ऑनलाइन गेममुळे तरुणांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
७० वर्षीय वयोवृद्ध महिला सुवर्णा नेवगी या डोंबिवली पश्चिमेला गेल्या होत्या. त्या डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरात असलेल्या रेल्वे पुलाच्या जिन्यातून डोंबिवली पूर्वेकडे येत होत्या. तेव्हा आरोपी त्यांच्या जवळ आला. त्याने सुवर्णा यांच्या गळ्यातील महागडे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
हा सर्व प्रकार त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्वेश राऊत नावाच्या तरुणाने बघितला. त्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. नंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याने याबाबत धक्कादायक माहिती दिली.
नितीन ठाकरे असे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा खासगी कंपनीत नोकरी करतो. रमी गेममुळे तो कर्जबाजारी झाला होता. यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला.