एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्र राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिंदेंच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. अशावेळी शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठकांचा धडाका लावला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल युवासेनेचा जाहीर मेळावा पार पडला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या अडीच वर्षांपासून पर्यावरण मंत्री म्हणून शांत आणि संयमाने वावरणारे आदित्य ठाकरे काल घेतलेल्या मेळाव्यात आक्रमक भूमिकेत दिसले.
आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना म्हणाले, हिंमत असेल तर राजीनामा पाठवा आणि निवडणुकीला सामोरे जा. आम्ही तयार आहोत. तसेच म्हणाले, तिथे जे आमदार बसले आहेत जे आपल्या संपर्कात आहेत. त्यांना आपण परत घेऊ शकतो. ज्यांनी बंड केला आहे, दगा दिला आहे त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणं नाही.
आदित्य ठाकरे म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मी हैराण देखील होतो. पण ठीक आहे, राजकारण म्हटल्यानंतर लोकं कशी बदलू शकतात हे आपण अनेक वर्ष बघितलं आहे. पण हाच प्रश्न सतावतो की आपण या लोकांना कधी कमी केलं आणि काय कमी दिलं?
कित्येक लोकांवर अन्याय झाला. हे आता दिसून येत आहे. काल पण कल्याण -डोंबिवली वरून कार्यकर्ते आले की त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. मातोश्रीवर आल्यावर त्यांचे फोन यायचे की तुम्ही तिथे का गेले म्हणून. हे आम्ही दुर्लक्ष केलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच म्हणाले, फ्लोर टेस्ट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी ते मुंबईत उतरतील. एअरपोर्टवर उतरले की विधान भवनात जाणारा रस्ता वरळी, परळ आणि वांद्रेतून जातो, अशा धमकीवजा इशारा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.