शिवसेनेने राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. माहितीनुसार, या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लागणार आहे.
शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास दानवे यांची वर्णी लावावी अशा आशयाचं पत्र पाठवलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता.
त्यामुळे आता, काल शिवसेनेने सेफ गेम करत उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित मराठवाड्यातील नव्या दमाच्या अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली आहे.
अंबादास दानवे यांचा आक्रमक स्वभाव आणि फर्डी भाषणकला तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे इच्छुक होत्या.
दुसरीकडे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे.
विधानपरिषदेत शिंदे सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज होती. हे काम अंबादास दानवे नेटाने करु शकतील. अंबादास दानवे यांची आक्रमक अभ्यासू नेता म्हणून ओळख आहे. संसदीय आयुधांचा योग्य वापर करुन ते सरकारला अडचणीत आणू शकतात, म्हणून उद्धव ठाकरेंनी दानवेंची निवड केल्याची चर्चा आहे.