राज्यसभेच्या निवडणुकीत अटीतटीची लढाई पाहिला मिळाली. निवडणुकीत एक एक मत महत्वाचं होतं. आपापल्या आमदारांना मतदाराचा हक्क बजावण्यासाठी सर्वच पक्षांनी व्हीप जाहीर केला होता. अशातच भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठीक नसताना देखील त्यांनी विधानभवनात हजेरी लावली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नाही. तसेच दुसरीकडे पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या कॅन्सरशी झुंज देत आहेत. असे असताना दोघेही विधानभवनात अँब्युलन्सने आले आणि आपली मतं दिली.
विजयानंतर फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचा झालेला विजय मी आमचे लढवय्ये नेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित करतो. तसेच पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनाही समर्पित करतो. तसेच म्हणाले, लक्ष्मणभाऊ काल अँब्युलन्समधून आले होते.
म्हणाले, काल त्यांच्या भावाला फोन केला, आणि म्हणालो एखादी सीट गेली काय, आली काय भविष्यात परत जिंकू, पण लक्ष्मणभाऊ आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. मात्र, लक्ष्मणभाऊ म्हणाले, मी माझ्या पक्षासाठी येणारच. असे फडणवीस म्हणाले.
त्यामुळे मी लक्ष्मणभाऊ यांचे आभार मानतो. तसेच मुक्ताताई टिळक यांचे देखील आभार मानतो. कारण, अतिशय विपरीत परिस्थितीत त्या विधानभवनात आल्या. आजचा विजय सर्वार्थाने महत्वाचा विजय आहे. तसेच म्हणाले, आमचे तिसरे उमेदवार जे निवडून आलेले उमेदवार त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजेच संजय राऊत यांच्यापेक्षा अधिक मतं घेतली आहेत.
आमचे माननीय पियुष गोयल हे ४८मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले आहेत. तेवढीच मतं आमच्या डॉ. बोंडे यांना मिळाली. ते देखील पहिल्या क्रमांकावर निवडून आले. धनंजय महाडिक यांना ४१.५६ मतं मिळाली, जी संजय राऊत यांच्यापेक्षा अधिक आहेत. शिवसेनेचं जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता हे फडणवीस यांनी स्पष्ट केले.