शाळेतील शिक्षिका रोज शाळेत उशिरा येत असल्याचं ग्रामस्थांना माहिती झाले, त्यांनी तिच्याबद्दल स्थानिक पत्रकाराला माहिती दिली. त्यानंतर पत्रकार संबंधित शिक्षिकेला शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारण्यासाठी गेला असता, शिक्षिकेने पत्रकारासोबत असे काही केले ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
संबंधित घटना ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावात घडली आहे. शाळेत सतत उशिरा येणाऱ्या शिक्षिकेचे नाव कविता मोरे असे आहे. कविता मोरे या जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या शाळेवर उशिरा येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.
याची दखल पन्हाळा परिसरातील स्थानिक दैनिकाचे पत्रकार रामचंद्र बाबु कर्ले यांनी घेतली. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार त्याने संबंधित महिलेबद्दल माहिती घेऊन तिला शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारण्याचे ठरवले त्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामॅनसह रिपोर्टिंग करण्यासाठी त्याची टीम शाळेत पोहोचली.
कविता मोरे नेहमीप्रमाणे शाळेत उशिरा येत असताना, पत्रकारांनी शाळेच्या आवारात त्यांना गाठले. पत्रकार रामचंद्र कर्ले हे शिक्षिकेकडे गेले आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊ लागले. यावर स्कुटीवरून येणाऱ्या कविता मोरे यांनी गाडीवरून उतरून डोक्यातील हेल्मेट काढले आणि पत्रकार रामचंद्र कर्ले यांना मारहाण सुरू केली.
पत्रकार रामचंद्र कर्ले यांना शिक्षिकेने हेल्मेटने मारहाण केल्यामुळे सर्व बघतच राहिले. रामचंद्र कर्ले यांच्यासोबत आलेले इतर लोक सर्व प्रकार पाहून अवाक झाले. एवढेच नाही तर प्रश्नांची उत्तरं न देता उलट संबंधित शिक्षिका त्यांना धमकावू लागली.
‘आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे. आमच्याविरोधात बातम्या लावू नका, आमची संघटना खूप मोठी आहे. परत जर आमच्या शाळेबद्दल बातम्या छापल्या तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, आमचा नाद करायचा नाही, अशा प्रकारे शिक्षिका धमकी देऊ लागली.
या सर्व घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं. पत्रकार रामचंद्र कर्ले यांनी झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि कविता मोरे यांच्याविरोधात तक्रार दिली. कर्ले यांच्या तक्रारीवरून कविता मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.