Share

तंटामुक्तीचा अध्यक्षच पोलिसांनी केला तडीपार; जुन्नर तालुक्यातील घटनेने खळबळ

सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हा गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या नारायणराव पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा जणांना नऊ दिवसांसाठी जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नारायणगाव पोलिसांनी संबंधित तरुणांना याबाबत नोटीस दिल्याचं समजत आहे. महत्वाची बाब म्हणजे, जुन्नर मधील तंटामुक्तीच्या अध्यक्षाला देखील तडीपार करण्यात आलं आहे. रोहन बेल्हेकर असं त्याचं नाव असून, त्याची बोरी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.

माहितीनुसार, रोहनवर विनापरवाना शस्त्र बाळगणे, जमावबंदी आणि मारहाण असे तीन गुन्हे दाखल आहेत. तो तालुक्यातील गणेशोत्सवात काहीतरी विघ्न आणेल, अशी शंका पोलिसांना होती. त्यामुळे रोहनला दहा दिवसांसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तडीपार केलं आहे.

आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना रोहनची वर्णी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी कशी काय लागली? त्याची ही निवड कोणी केली?ग्रामसभेने एकमुखाने याला संमती कशी काय दिली?असे अनेक प्रश्न आता यानिमित्ताने पुढे येत आहेत. त्याविषयी चर्चा सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनची ही निवड गेल्या आठवड्यातच झाली आहे. पण जेव्हा तो अध्यक्ष झाला तेव्हा त्याने सोशल मीडियावर फोटोसह ही माहिती शेअर केली अन त्यानंतर त्याला तडीपार करण्यात आलं. पण तो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे हे पोलिसांना समजताच त्यांनाही धक्का बसला.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले, गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चौदा आरोपींना जुन्नर तालुक्यातून तडीपार करावे असा प्रस्ताव नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे यांना पाठवण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या प्रवेश करण्याच्या मनाई आदेशानुसार संबंधित चौदा आरोपींना काल सकाळ पासून गणेशोत्सव काळात पुढील नऊ दिवस तडीपार करण्यात आले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now