एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाचा ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरून आता मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झालेल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यामध्ये किरणकुमार बकाले हे एका पोलीस कर्मचाऱ्याशी बोलत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे आता त्यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात येवून उचलबांगडी करण्यात आली आहे.
सध्या या ऑडिओ क्लिपमुळे किरणकुमार बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येवून त्यांचे निलंबन करण्यात यावे, यावरुन मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या ऑडीयो क्लिपबाबत तसेच प्रकाराची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. डॉ प्रवीण मुंढे यांनी किरणकुमार बकाले यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, योग्य ती चौकशी करण्यात येवून असून किरणकुमार बकाले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. यावर आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम पोलीस अधीकार करत असतील, तर अशा प्रवत्तींना जागीच ठेचलं पाहिजे. कुठल्याही अधिकाऱ्याची असली मगरुरी खपवून घेतली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार करणार असे चव्हाण म्हणाले.