शिवसेना जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी काल आमदार संजय शिरसाट यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला होता. आज त्यांनी भायखळा विधानसभा मतदरासंघाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये यामिनी जाधव यांनी आपला भावपूर्ण प्रसंग सांगितलेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओवरती लिहिले आहे की, ‘शिवसेना आमदार सौ यामिनी जाधव यांनी सांगितलं भावपूर्ण प्रसंग…आम्ही सर्व शिवसेनेतच पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावं. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य…’
व्हिडीओमध्ये यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांतील घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. आम्हीच अजूनही शिवसैनिक आहोत, पुढील काळातही राहणार आहोत, हे जगही शिवसैनिक म्हणून सोडू.
यशवंत जाधव हे ४३ वर्ष शिवसेनेत आहेत, वयाच्या १७ वर्षांपासून आम्ही शिवसेनेत आहोत. अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचणी आल्या, निवडणुका हराव्या लागल्या, पण तरीही त्यांनी पक्षाविरोधात कधी विचार केला नाही, असे यामिनी जाधव म्हणाल्या.
तसेच म्हणाल्या, गेल्या ऑक्टोबर महिन्यात माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. कॅन्सर नावाचं. मला कॅन्सरचं निदान झाल्याचं समजताच संपूर्ण कुटुंब हादरलं. पक्षातील नेत्याला असा आजार झाल्यास पक्षप्रमुखांना कळवण्याचा नियम असतो.
https://twitter.com/mieknathshinde/status/1540305087276339201?t=6JFDfn_le1HMiH1rOhHnsg&s=19
त्याप्रमाणे यशवंत जाधव यांनी पक्षाला कळवलंही. पण त्यांच्याकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. महिला आमदार कॅन्सरग्रस्त आहे, त्यामुळे माझी अपेक्षा होती. पण त्यांनी चौकशीही केली नाही. माझ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी मला या काळात खूप साथ दिली.
माजी महापौर किशोरीताईही भेटायला आल्या. त्यांनी माझ्यासोबत दोन तास चर्चा केली. मला मार्गदर्शन केलं. अध्यात्मिक सल्ला दिला. पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती की मला आणि माझ्या कुटुंबाला आधाराची थाप दिली जाईल. पण तसं झालं नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या कोणीही कोणत्याही नेत्याने माझी विचारपूस केली नाही. अशी खंत यामिनी जाधव यांनी बोलून दाखवली.