महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय आणि धार्मिक वातावरण चांगलंच पेटलं आहे. असे असताना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी काढले आहेत.
धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करीत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, हनुमान चालीसासाठी परवानगीशिवाय कोणाला भोंगे लावता येणार नाही. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास 4 महिने तुरुंगवास शिक्षा, याशिवाय थेट हद्दपार किंवा 6 महिने प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत आणखी 6 महिने कारावास करण्याची तरतूद केली आहे.
हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी प्रतिबंध न करता 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना मशिदीपासून 100 मीटर दूर अंतरावर तेही नमाजाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर पंधरा मिनिटांचे बंधन असणार आहे. तसेच, भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहे.
दीपक पांडये यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, मुस्लीम समाज, मर्कज संस्था, शासन निर्णय, सुप्रीम कोर्टाचा 18 जुलै 2005 रोजीचा निर्णय, विशेष शाखा लॉ ऑर्डर रिपोर्ट हे सारे लक्षात घेऊनच आपण भोंग्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त म्हणून शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यात कुणालाही काहीही चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जावे. राज्य घटनेनुसार सर्वांना आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणीही सामाजिक सहिष्णुता बिघडेल असे वर्तन करू नये. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. आधी हेल्मेटसक्ती, नंतर महसूल खात्याविरोधातला लेटरबॉम्ब आणि आता भोंग्याचे आदेश यामुळे दीपक पांडेय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.