राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉंग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष (Congress President) गांधी कुटुंबाबाहेरचा असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विदेशात जाण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना स्पष्ट आदेश दिले की, पक्षाला आपली गरज आहे. आपण काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता अशोक गहलोत हे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र अशोक गहलोत यांनी मात्र राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जातील, असं उत्तर दिलं आहे. यामुळे आगामी काळात नेमकं कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा अशोक गहलोत काय म्हणाले?
अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची ऑफर दिली असल्याचा दावा फेटाळला आहे. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली असून, आपण त्याच्याशी तडजोड करणार नाही असंही अशोक गहलोत यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
याचबरोबर काँग्रेस कार्यसमितीची बैठक 28 ऑगस्टला बैठक होणार आहे, या बैठकीत राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, ही आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया अशोक गहलोत यांनी दिली. तसेच ‘जर राहुल गांधी अध्यक्ष बनले नाहीत तर अनेक लोक निराश होतील आणि घरी बसतील,’ असंही गहलोत म्हणाले.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाला प्राधान्य आहे. मात्र अशोक गहलोत ही जबाबदारी स्वीकारण्यास अनुत्सुक आहेत. गांधी कुटुंबातील व्यक्ती नसताना पक्षाचं अध्यक्षपद मिळालं तरी, हातात जास्त अधिकार नसतील याची कल्पना गहलोत यांना असल्याच बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या