Share

Eknath shinde : प्रचंड गाजावाजा केलेला शिंदे गटाचा ‘तो’ बार निघाला फुसका; आपटले तोंडावर

Eknath Shinde

संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा अखेर पार पडला. शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार हे ठाकरे गटासाठी मोठं आव्हान होते. त्यात ऐन दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे ३ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असा दावा करण्यात येत होता. मात्र, मेळाव्यात प्रत्यक्ष तसे काहीच घडले नाही.

शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, असे वक्तव्य खासदार कृपाल तुमाने यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. तसेच पुढील काळात आणखी १० ते १२ आमदार शिंदे गटात येतील. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात आलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले होते.

कृपाल तुमाने यांची केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. कृपाल तुमाने यांच्या विधानाने उद्धव ठाकरे गटात मोठी चिंता निर्माण झाली होती. ऐन दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का बसणार की काय अशी चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली.

ठाकरेंची साथ सोडून कोणते आमदार आणि खासदार शिंदे गटात जाणार, याविषयी बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील असाच काहीसा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यात शिवसेनेतील अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश होतील, असा अंदाज वर्तविला जात होता.

मात्र, आमदार आणि खासदार सोडाच पण बीकेसीच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या साध्या पदाधिकाऱ्याचाही शिंदे गटात पक्षप्रवेश झाला नाही. त्यामुळे शिंदे गटाचा हा बार फुसका निघाल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडला.

दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर कितपत गर्दी जमेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. एकाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत असल्याने शिवसैनिकांच्या मनात दुही निर्माण झाल्याचे चित्र होते.

मात्र, तरीही या दुहीला बाजूला सारत अनेक जुन्या-नव्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी दुपारी १२ वाजल्यापासूनच शिवाजी पार्कवर यायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला देखील तुफान गर्दी दिसली. काही खासदार शिंदे गटात जाणार हा दावा देखील फोल ठरला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now