आपल्या मुलाला गांजा पिण्याचे व्यसन लागल्याने, आईने मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे. मुलानं व्यसन करणं बंद करावं म्ह्णून आईने चक्क आपल्या पोटच्या मुलाला विजेच्या खांबाला बांधून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना तेलंगणामध्ये सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड भागात घडली आहे. आईने गांजाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर तिखट पूड टाकली आहे. मुलाचे वय अवघे 15 वर्षे आहे. मुलाला वारंवार सांगून देखील तो व्यसन करत असल्यामुळे आईने हे पाऊल उचलले आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, आपल्या 15 वर्षांच्या मुलाला लागलेल्या गांजाच्या व्यसनामुळे त्रासलेल्या आईने त्याला एका खांबाला बांधले आहे. एवढेच नाही तर तिने त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर तिखट पूड टाकली आहे.
मुलाने व्यसन सोडावं यासाठी आईने त्याला वारंवार सांगितले मात्र, तो व्यसन सोडायला तयार नव्हता. मुलगा ऐकत नसल्यामुळे तिनं त्याला अशी अद्दल घडवली. नाकातोंडात मिरची पूड गेल्याने मुलगा मोठ्याने ओरडू लागला. मात्र, आईने त्याच्यावर दया दाखवली नाही.
जोपर्यंत, मुलगा व्यसन सोडतो असे म्हणत नाही तोपर्यंत तिनं त्याच्या चेहऱ्यावर मिरची पूड चोळली. शेजाऱ्यांनी मुलाला होत असलेल्या वेदना पाहून त्याच्यावर पाणी टाकण्यास सांगितले, मात्र महिलेने कोणाचे ऐकले नाही. आपल्या मुलाला तिनं चांगलीच अद्दल घडवली.
अखेर मुलाने आईला यापुढे व्यसन करणार नसल्याचं वचन दिलं. तेव्हाच आईने मुलाची सुटका केली. मुलाला मिरची पूडचा वापर करून अद्दल घडवणं ही बाब तेलंगणात नवी नाही. अलीकडच्या काळात तेलंगणामधील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन हे एक मोठे आव्हान आहे. पालक बऱ्यापैकी मुलाला व्यसन मुक्त करण्यासाठी अशीच पद्धत वापरत आहेत.