माहेरी असलेली पत्नी आपल्या घरी येत नसल्यामुळे रागात पतीने मध्यरात्रीच सासरवाडीत जाऊन धिंगाणा घातला. सासूशी त्याचे वाद झाले. वाद एवढा टोकाला गेला की, त्या जावयाने आपल्या सासूला मारून टाकले. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं.
ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील शेदूंरजनाघाट मलकापूर येथे घडली आहे. मलकापूर येथील प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्याची सासरवाडी आहे. त्याची पत्नी त्याच्यासोबत न राहता माहेरी मलकापूर येथे राहते. पत्नीने सोबत येण्यासाठी नकार दिल्यामुळे, मध्यरात्रीच तो सासरी पोहोचला. त्याचे तिथे सासू आणि पत्नीशी वाद झाले.
दरम्यान, या वादातून जावयाने सासूचा खून केला. या घटनेनंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी जावयाचे नाव जिवनू रिमकलाल धूर्वे आहे. तो मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील मोकड तालुक्यात राहणारा आहे.
त्याचं, मृतक चंद्रकला संतलाल तूमडाम यांच्या मुलीशी काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिवनू याची पत्नी आपल्या माहेरी येऊन राहू लागली होती. पत्नी आपल्यासोबत राहत नसल्याने जिवनू त्रस्त झाला होता. त्यामुळे त्यानं मध्यरात्री मद्यपप्राशन करून सासरवाडीत सासू चंद्रकला सोबत वाद घातले आणि तिचा खून केला.
या प्रकरणी फिर्यादी सुनिल संतलाल तूमडाम यांच्या फिर्यादी विरुद्ध भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली असता पहाटेच्या दरम्यान आरोपीला तिवसाघाट येथून अटक करण्यात आली. आरोपी जिवनू यानं आपला गुन्हा मान्य केला.
आरोपी जिवनू यानं पोलिसांना सांगितले की, आपल्या पत्नीला तिची आई सासरी पाठवत नव्हती. यामुळे मध्यरात्री मद्यप्राशन करून सासरी येऊन सासूसोबत वाद झाले. हा वाद एवढा वाढला की रागात मी माझी सासू चंद्रकला यांचा खून केला. आरोपी जिवनू सध्या गजाआड आहे.