काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांची बैठक बोलविली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे, अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप, अजित पवार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दावने बोलत असताना घेतलेल्या डुलक्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेनेचे औरंगाबादमधील आक्रमक नेते अंबादास दावने यांची नुकतीच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधी नेत्यांना मोठा मान असतो. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
दानवे यांचे हे विरोधी नेता म्हणून पहिलेच अधिवेशन आहे. त्यात काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांची बैठक बोलविली. त्याला दिग्गज नेते हजर होते. सरकारला कसे कोंडीत पकडायचे याची रणनीती या बैठकीत ठरली.
त्यानंतर दोन्ही विरोधी नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी, महाविकास आघाडीतील दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेते विरोधी नेत्यांसोबत व्यासपीठावर बसले होते. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, शिवसेनेचे अनिल परब, काॅंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांचा समावेश होता.
ही पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरल्याचं कारण म्हणजे, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलण्याची सुरुवात केली, शिंदे गटातील संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांना इशारा दिला. त्यांच्यानंतर अंबादास दानवे यांनी बोलायला सुरुवात केली.
यावेळी, दानवे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. त्या वेळी शेजारी असलेले नेते पेंगू लागले. पत्रकारांसमोरच हे नेते पेंगू लागल्याने दानवे यांच्या मुद्द्यांमध्ये नेत्यांना दम वाटत नव्हता की काय असा प्रश्न पत्रकारांना यावेळी पडला.
या नेत्यांचे डुलक्यांचे छायाचित्र टिपण्यात आले. त्यात दिसत आहे की, अजितदादांचे डोळे उघडे असून बंद असल्यासारखे आहेत. बाळासाहेब थोरात हे चिंतन करत असल्याचा भास दाखवत आहेत. भाई जगताप झोपेच्या अधीन झाले आहेत. तर, एकनाथ खडसे दोन्ही हातांची घडी घालून मस्त डुलकी घेताना दिसत आहेत. त्यामुळे ही पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली.






