विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये याचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. एवढेच नाही तर याचे पडसाद राजकारणात देखील पडलेले आहेत. सभागृहात ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या जात आहेत. काहींच्या चित्रपटाबद्दल वाईट कंमेंट देखील येत आहेत. अशातच, विवेक अग्निहोत्री यांचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
1990 मध्ये खोर्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित चित्रपटाच्या वाढत्या वादाच्या दरम्यान दिग्दर्शकाचे एक जुने ट्विट आणि एक फोटो पुन्हा समोर आला आणि व्हायरल झाला. हे ट्विट 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये विवेक जामा मशिदीसमोर नमाज पढताना दिसत आहे.
या फोटोत विवेक अग्निहोत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जामा मशिदीत.’ यासोबतच त्यांनी #Freedom देखील लिहिले. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. एकीकडे ‘द काश्मीर फाईल्स’ तर दुसरीकडे त्याचा हा मशिदीसमोर नमाज करतानाचा फोटो पाहून लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मतं मांडत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हा चित्रपट फक्त 700 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता, पण जबरदस्त यश पाहून तो 2000 स्क्रीन्सवर रिलीज झाला. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 60 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन दिवसामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ ने केली आहे. दिवसेंदिवस याचा गल्ला वाढत चालला आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार आहेतच पण त्याचबरोबर पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे अनुभवी कलाकार देखील या सिनेमात भूमिका करत आहेत.