शुक्रवारी दिनांक 4 मार्च ला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याच्या आनंदात काल अनेक ठिकाणी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीत कलाकार यांनी सिनेमागृहाबाहेर जल्लोष केला. मात्र आता या चित्रपटाची कमाई हवी तशी झाली नसल्याचं बोललं जात आहे.
‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बिग बीचं सिनेमात असणं, आमिर खाननं केलेली स्तुती, कोरोनानंतर प्रदर्शित होणारी बडे परदे पर बडी फिल्म असं झालेलं प्रमोशन. यामुळे कुठेतरी हा चित्रपट फाडू कमाई करणार असेच वाटले होते.
या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली, जेवढे कौतुक झाले तेवढा हा चालला नाही असे चित्र दिसून येत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात रिलिज झालेला झूंड बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालाय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
चित्रपट आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित झाला, सिनेमाचा पहिला दिवस हा महत्वाचा असतो. बॉक्स ऑफिसवर तो काय कमाल करतो याकडे सर्वांचेच लक्ष असतं. मात्र, आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होऊन देखील त्याची कमाई अधिक झाली नाही. प्रेक्षकांनी त्याला अधिक पसंती दिली नाही.
शुक्रवारचे आकडे समोर आलेत आणि कमाईचे हे आकडे फक्त नागराजच मंजुळे नाही तर त्यांचं जे एक स्वतंत्र फॅन फॉलोईंग तयार झालंय त्यांचीही निराशा करणारं आहे. फिल्म परिक्षक तरण आदर्शनं कमाईचे आकडे ट्विट केले आहेत. त्यात झुंडनं पहिल्या दिवशी फक्त दीड कोटीचा गल्ला जमवल्याचं म्हटलं आहे.
#Jhund Fri ₹ 1.50 cr… With glowing word of mouth, the film needs miraculous growth on Day 2 and 3 to cover lost ground. #India biz. pic.twitter.com/fYigJ5RPw4
— taran adarsh (@taran_adarsh) March 5, 2022
अमिताभ बच्चन ज्या चित्रपटात आहेत, त्याची कमाई एवढी कमी यावर कोणाचा विश्वास बसत नाही. सध्या झुंड न चालण्याची कारणं देखील देता येतील, सिनेमागृहात सध्या पावनखिंड अजूनही हाऊसफुल आहे. हिंदीतला संजय लीला भन्साळीचा गंगुबाई काठियावाडी अजून बॉक्स ऑफिसवर फुल कमाई करतोय. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात तरी झुंड चांगली कमाई करू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.