मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जे शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत त्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. ही सूचना खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांना मिळाली आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना सप्टेंबर २०२२च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नये, अशी स्पष्ट सूचना केली असल्याने खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबादचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विलास केवट यांनी मंगळवारी दिनांक ६ रोजी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हंटले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे.
मुख्याध्यापकांनी संबंधिताचे माहे सप्टेंबर २०२२चे पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नये. तसेच मुख्यालयात राहत नसलेबाबत निदर्शनास आल्यास नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असेही नमूद केले आहे.
यामध्ये चुकीची माहिती देणारे मुख्याध्यापक यास स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी असे सांगितले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार बंब यांनी शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयी न राहता फुकटचे घरभाडे उचलण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यानंतर बंब यांना शिक्षक व त्यांच्या संघटनांच्या रोषाला देखील समोर जावे लागले. पिढ्या घडवणारे शिक्षक मुख्यालयी न राहता पिढ्या बरबाद करत आहेत, असा गंभीर आरोप देखील बंब यांनी केला होता. मात्र, सध्या खुलताबाद येथील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.