शिवराज्यभिषेक दिननिमित्त संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संभाजीराजे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मागील काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकीय वर्तुळात खलबत सुरू होतं.
अखेर संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर यांचे पिता छत्रपती शाहू महाराज यांनी देखील राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केलं. शाहू महाराज यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात अंतर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे असे म्हटले होते.
याचाच धागा पकडत संभाजीराजे यांनी आज भाष्य केलं आहे. ते म्हणतात, ‘त्या काळात शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक बादशाही उभ्या होत्या. शिवाजी महाराजांना अडवायला हवं. मग काय करायला हवं? त्यांनी बाप-लेकात भांडणं लावायची ठरवलं. शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यात भांडणं लावली आणि शहाजीराजेंवर दबाव आणला.’
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणतात, ‘शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं. पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, आदिलशाहीने शहाजीराजेंना पत्र लिहिले होते.
‘त्या पत्रामद्धे तुमच्या मुलाला घरात थांबवा नाहीतर आमच्यात सामील करुन घ्या म्हटले. यावर शहाजीराजेंनी उत्तर दिले होते की, हा माझा मुलगा आहे पण माझे काही ऐकत नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी तुमच्यासोबत प्रामाणिक आहे, असे शहाजीराजेंनी म्हटले, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजेंना काही सांगत नसतील का? असा सवाल उपस्थित करत मग ते असं का म्हणाले हे मी सांगणार नाही ते तुम्हीच शोधून काढा,” असे संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी प्रत्यक्षपणे भाजपला धारेवर धरले.