मेहनत केली तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते, असे आपण नेहमी ऐकतो. मेहनतीला गरीब, श्रीमंत अशा गटात टाकता येत नाही. आपल्यासमोर आता अशी बातमी येत आहे, ज्यामध्ये एका गरीब घरातील सायकल रिपेअरिंचे काम करणाऱ्या तरुणाने आपल्या मेहनतीवर बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक 36 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे.
या विद्यार्थ्यांचे नाव राहुल बडगुजर आहे. तो पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. घरातील परिस्थिती ही गरिबीची असताना, त्याने केवळ मेहनत करून आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि बहुराष्ट्रीय कंपनीत तब्बल 36 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवली. त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
राहुल हा सिन्नर तालुक्यातील माळेगाव गावाचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे सायकल रिपेरिंगचे दुकान आहे, तर आई ‘एमआयडीसी’मधील छोट्या कंपनीत कामगार आहे. त्याचा भाऊ ड्रायव्हर आहे. घराची अशी प्रतिकूल अवस्था असताना देखील राहुलने परिश्रम व जिद्दीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे.
राहुल आपल्या यशाबद्दल मत व्यक्त करताना म्हणाला, अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऑनलाइन प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धांमध्ये नियमित भाग घेत होतो. अभ्यासक्रमातील विषयांव्यतिरिक्त इंटर्नशिप केल्यामुळे कंपनीतल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने माझे प्रॅक्टिकल ज्ञान वाढले. त्याचा मला खूप फायदा झाला.
राहुल आयटी शाखेचा विद्यार्थी असून, त्याला ‘डाटा इनसाइट्स’ या कंपनीने नोकरीची ऑफर दिली आहे. राहुलची ‘डाटा इनसाइट्स’ कंपनीकडून ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ या पदासाठी निवड झाली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे व पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.
पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे दर वर्षी 350 कंपन्यांद्वारे विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. पीसीईटी-नूतन ग्रुपच्या अंतिम वर्षातील एक हजार 587 विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत एक हजार 543 नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.