‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली. आता या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमामध्ये अजय- अतुल यांचे संगीत असणार आहे. मात्र, या चित्रपटातील छोटा शाहीर साबळेंच्या आवाजातील गाणे कोण गाणार ?असा प्रश्न अजय अतुल यांना पडला होता. यावर त्यांना आता एक लहान मुलगा मिळाला आहे.
अजय -अतुल यांना चित्रपटाच्या गाण्यासाठी जो मुलगा मिळाला आहे तो मध्यंतरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक शाळकरी मुलगा विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बाकाजवळ उभा राहून ‘चंद्रा’ गाणं गाताना दिसत होता.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटींनीही हा व्हिडिओ शेअर केलेला. हा व्हिडिओ होता जयेश खरे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा. जयेशला यानंतर विशेष प्रसिद्धी मिळाली. माध्यमंही त्याच्यापर्यंत पोहोचली. आता जयेशपर्यंत थेट अजय-अतुल पोहोचले असून ते ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात त्याला गाण्याची संधी देणार आहेत.
अजय अतुल यांनी जयेशला छोट्या शाहीर साबळेंच्या आवाजातील गाणे गाण्यासाठी करारबद्ध केले आहे. हे गीत आजचे आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. जयेश बद्दल अधिक माहिती म्हणजे, जयेश शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणारा गरीब घरातील मुलगा आहे.
‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे त्याने शाळेच्या गणवेशात गायलेले गाणे सध्या युटयूबवरून उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. हे गाणे जेव्हा संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी शाहीरांच्या लहानपणीचे गाणे जयेशकडून गाऊन घ्यायचे ठरवले.