राज्यातील रायगड, उरण आणि कर्जत या भागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद असल्याचं मानलं जातं. याशिवाय गेली अनेक वर्ष या शहरं शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जात होता. परंतु आता त्याला उतरती कळा लागलेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शेकापच्या अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षांत प्रवेश करायला सुरुवात केली आहे.
गेली ३२ वर्ष शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ट असणाऱ्या मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत क्षेत्रातील ‘वरची वावडुंगी’ या अख्ख्या गावानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. गावाचा विकास होत नसल्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची तक्रार होती. त्यात अलिबाग-मुरुडचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लक्ष घालत ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. याशिवाय गावातील सर्व लोकांना शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलं आहे.
‘वरची वावडुंगी’ हे गाव मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. गेली ३२ वर्ष या गावातील लोकांनी सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला विजयी केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षासाठी हा मोठा जबर झटका मानला जात आहे. याशिवाय हे गाव शिवसेनेत आल्यानं या भागात शिवसेनेची चांगलीच ताकद वाढली आहे.
‘आमचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आमच्या गावासाठी ३० लाख रुपयांची पाणी योजना मंजूर केली, त्यामुळं त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आम्ही सर्व गावकरी शिवसेनेत प्रवेश करत आहोत’, अशी घोषणा गावचे प्रमुख मधुकर भुवड यांनी केली आहे.
वरचीवाडी वावडुंगी गावाचा शिवसेनेत प्रवेश होत असल्यानं मला त्याचा फार आनंद होत आहे. माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास नागरिकांनी दाखवला, त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, आणि आता यानंतर गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी सांगितलं.
या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला शिवसेना आमदार महेंद्र दळवी, वावडुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र भेकरे, उपसरपंच, दिपेश वरणकर, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, शहर प्रमुख आदेश दांडेकर, शीघ्रे गावचे सरपंच संतोष पाटील, काशीद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाची कोकणात चांगली ताकद असल्याचं मानलं जातं. याशिवाय कोकण हा शिवसेनेचाही गड मानला जातो. त्यामुळं आता कोकणात दबदबा असणाऱ्या दोन्ही पक्षांच्या बाबतीत ही फार मोठी घडामोड आणि कारण याचा परिणाम कोकणातील पुढील निवडणूकांवर होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.