भारताचा प्रसिद्ध स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युजवेंद्र चहलने एक खळबळजनक खुलासा केला होता. त्यात त्याने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. जेव्हापासून त्यानं तो किस्सा सांगितला तेव्हापासून भारतीय क्रिकेट वर्तृळातून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. आता या प्रकरणात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे.
युजवेंद्र चहलने ज्या गोष्टींचा खुलासा केला होता, त्यात त्याने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना जवळपास मृत्यूच्या दारात पोहोचलो असल्याचे सांगितले होते. तसेच एका मद्यधुंद खेळाडूने मला 15 व्या मजल्याच्या बाल्कनीवरून खाली लटकवले होते. त्यावेळी थोडी जरी चूक झाली असती तर मला जीव गमवावा लागला असता. असं सांगितलं होतं.
राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओत या घटनेबद्दल युजवेंद्र चहल बोलला होता. म्हणाला की, ‘माझी ही गोष्ट काही लोकांना माहिती असेल मात्र मी ही कधी सांगितली नाही. मी मुंबई इंडियन्समध्ये असताना एका मद्यधुंद खेळाडूने मला 15 व्या मजल्याच्या बल्कनीवरून लटकवले होते. त्यावेळी मी माझा हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट धरून ठेवला होता. मात्र जर एखादी जरी चूक झाली असती तर मी खाली पडलो असतो.’
त्याच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळातून याबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. म्हणाले की, जर एखादा खेळाडू असा करत असेल तर त्याचे डोके ठिकाणावर नाही.
ईएसपीएनक्रिकइंफो टी20 टाइम आऊट कार्यक्रमात बोलत असताना या घटनेबद्दल शास्त्री म्हणाले की, ही काही चेष्टेची गोष्ट नाही. मला माहिती नाही यात कोणता खेळाडू सहभागी होता. तो शुद्धीत नव्हता. जर असे असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. कोणाच्या जीवाशी खेळ होतोय आणि काही लोकं हे चेष्टेवारी नेत आहे. माझ्यासाठी तरी ही चेष्टेची गोष्ट नाही.
जो कोणी अशी चेष्टा करत होता तो शुद्धीत नव्हता. शुद्धीत नसताना तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर चूक होण्याची दाट शक्यता असते. ही गोष्ट स्विकारणे कठिण आहे. अशा वेळी खेळाडूंनी तक्रार करणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर त्वरित कारवाई करता येईल.
तसेच म्हणाले, ज्या प्रमाणे तुम्ही भ्रष्टाचार विरोधी समितीकडे फिक्सिंग संदर्भात त्वरित जाऊन तक्रार करता. त्याच प्रमाणे इथे देखील त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. असे रवी शास्त्री यांनी युझवेंद्र चहल याने सांगितलेल्या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले.