आपल्याकडे डाँक्टरांना नेहमीच देवदुतासमान मानण्यात आले आहे. अशा कित्येक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये डाँक्टरांनी शेवटच्या क्षणाला रुग्णाचे प्राण पुन्हा आणले आहेत. आता देखील छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तीचे प्राण वाचविले आहे.
या महिलेच्या पोटात तब्बल तीन किलोग्रॅम वजनाची ट्यूमरची गाठ झाली होती. त्यामुळे अनेक डाँक्टरांनी या महिलेवर उपचार करण्यासाठी नकार दिला होता. शेवटी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दुर्ग जिल्हा रुग्णालयाने होकार दिला. ही शस्त्रक्रिया नाजूक असल्यामुळे या शस्त्रक्रियेत महिलेच्या जीवाला धोका होता.
मात्र तरी देखील डॉक्टरांनी हार न मानता महिलेची शस्त्रक्रिया योग्यरित्या पार पाडली आणि महिलेला नवीन जीवदान दिले. गेल्या अनेक दिवसांपासुन या त्रासाला कंटाळलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यासाठी डाँक्टरांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या याचं प्रयत्नांना अखेर यश आले.
या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना, गेल्या अनेक दिवसांपासून ममता निषाद या ट्यूमरच्या उपचारांसाठी वेगवेगळे रुग्णालय फिरत होत्या. मात्र कोणीही उपचार करण्यासाठी तयार नव्हते. शेवटी शासकीय जिल्हा रुग्णालयाने हि जबाबदारी स्वीकारून त्यांना या त्रासापासून मुक्त केले आहे.
आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. त्याचबरोबर, “मी एक-दोन नव्हे तर अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारल्या, पण उपचार तर सोडाच पण डॉक्टरांना माझ्या आजाराचं नेमकं निदानही करता आलं नाही.” असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या ममता निषाद यांनी सांगितले आहे.
इतकेच नव्हे तर, “माझ्या पोटात असहाय्य वेदना होत होत्या. प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होत असे. गेल्या दोन वर्षांपासून मी हा त्रास सहन करत होते. शरीरात केवळ दोन ते अडीच ग्रॅम हिमोग्लोबीन शिल्लक होतं. या स्थितीत मी या रुग्णालयात दाखल झाले” अशी माहिती त्यांनी दिली आहे.