राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच २० जूनला राज्यात विधान परिषदे निवडणूक होणार आहे, या पार्श्वभूमीवर देखील घडामोडी होताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीच्या धामधुमीत त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले आहे. बहिणीच्या जाण्याने सदाभाऊ खोत दुःखी असून, त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी लिहिले की, मरळनाथपूर या छोट्याशा गावामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही लहानाचे मोठे झालो.
इवलसं गाव डोंगर कपारीमध्ये असणारी शेती. उन्हाळा आला की सगळं बोखाडमाळ डोळ्यासमोर पाहिला मिळायचं. रानामध्ये जनावरांच्या मागं आम्ही भावंड गेलो की पायामध्ये सड, बोराडी चा काटा आणि अनेक काटे घुसायचे. घरात आलं की काटा घुसलेल्या पायाला बिब्याचा नाहीतर गुळाचा चटका द्यायचो, आणि पाय बांधायचो. दुसऱ्या दिवशी काटा आपोआप बाहेर यायचा.
तसेच त्यांनी लिहिले की, सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायला मिळायची. चपातीने तर कधी आम्हाला तोंड दाखवलच नाही. काळी पडलेली हायब्रीड ज्वारीची भाकरी ही आमच्या ताटात असायची, आणि भात कधी तरी नवसालाच असायचा. अशा सगळ्या गरिबीमध्ये हा चाललेला प्रपंचाचा गाडा.
आमच्याकडे गाई, म्हशीचं दूध भरपूर असायचं. दूध भाकरी खायचा एक वेगळाच गोडवा मनामध्ये राहायचा. तीन चुलते त्यांची मुलं असं नाही म्हटलं तरी आमचा सगळा पंधरा- सोळा माणसांचा खटला होता. मात्र लोक जास्त असून पण, गरिबीमुळं घर बांधायला येत नव्हतं. कालांतराने आम्ही भावंड मोठी झालो, आणि आम्ही राहण्यासाठी शेतात घर बांधण्याचा निर्णय घेतला.
पालाच्या घरात काही दिवस राहिल्यानंतर दोन चुलते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी पैसे कमावले, आणि शेतात दगड मातीचं कौलारू घर उभं केलं. त्यात आम्ही भावंड राहू लागलो. गरिबीमध्ये कधी श्रीमंतीचं वारं सुद्धा आम्ही पाहिलं नसल्यानं आम्ही बहिणी भावंडं आनंदाने एकत्र राहत होतो.
त्यानंतर ह्याच दारिद्र्यामध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं. ४ जूनला तिच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं. त्यावेळेस ती मुंबईलाच होती. मुंबईतच एका छोट्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं. तिला हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. त्यावेळी मी कांदा परिषदेला नाशिकच्या दौऱ्यावर होतो.
त्यानंतर भावाचा फोन आला आणि बहिणीची तब्येत खराब झाली ऑपरेशन होऊ शकत नाही असे डॉक्टरने सांगितले असं भाऊ फोनवर बोलला. मग मी ई. एम हॉस्पिटल मुंबईमध्ये तिला घेऊन यायला सांगितलं. मी सगळा कार्यक्रम आटपून बहिणीकडे गेलो आणि तिला फुलांचा गुच्छ दिला. मी गेल्यावर तिच्या गालावर हसू उमटलं. तिनं मला कंबरेला मिठी मारली.
मिठी मारल्यानंतर माझे डोळे पाणावले. वेड्या बहिणीची वेडी माया. मला वाटलं ती बरी होईल. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांना ऑपरेशनसाठी बोललो. ८जूनला मी कामानिमित्त बाहेर आलो. भावाचा फोन आला बहिणीची धाप वाढली म्हणून. मी तात्काळ दवाखान्यात गेलो, पण माहिती झालं, मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली आहे.