दिल्लीचा एक इंजिनिअर तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा शोध मागील चार दिवसांपासून सुरू होता. मुलाचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने 1 लाखाचे बक्षीस देखील ठेवले होते. काल हा बेपत्ता तरुण सापडला खरा, पण मृतावस्थेत सापडला. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
हा इंजिनिअर मुलगा मुळचा दिल्लीतील रहिवाशी आहे. त्याचे नाव फरहान शहा असे आहे. तो कामानिमित्त कोल्हापूरला आला होता यावेळी दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळा-खंडाळ्याचा फेरफटका मारायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो जंगलसफारीला गेला, मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला.
20 मे पासून हा तरुण लोणावळा आणि खंडाळाच्या जंगलात बेपत्ता होता. 20 मे रोजी दुपारी अडीच्या सुमारास त्याचा कुटुंबियांशी शेवटचा संपर्क झाला होता. कुटूंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आणि काल तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला.
लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 24 मे ला आयएनएस शिवाजी येथील जवानांना दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर एनडीआरएफचं पथक दरीत उतरलं. त्यावेळी फरहानचा मृतदेह सापडला.
लोणावळ्यातील जंगलात रस्ता शोधत असताना 300 ते 400 फुटांवरून फरहान दरीत कोसळला असल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस, शिवदूर्ग रेस्क्यू,कुरवंडे गावचे ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते.
ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेताना त्याचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान, फरहान शहा यांच्या परिवाराने एक पत्रक प्रसिद्धीसाठी काढले होते. जो कोणी बेपत्ता फरहान शहा याला शोधून काढेल त्याला एक लाखाचे बक्षीस मिळणार, असल्याचे या पत्रकात म्हटले होते. मात्र त्याचा मृतदेह मिळाल्याने कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.