टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं काल भीषण कार अपघातात निधन झालं. सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाने उद्योग जगतात शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काल सायरस मिस्त्री त्यांच्या मर्सिडीज कारने गुजरातच्या उदवाडा येथून मुंबईकडे परतत होते. त्यांच्या गाडीत एकूण चार लोक होते. यापैकी दोघांचा अपघातामध्ये मृ्त्यू झाला, तर दोनजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहाचे आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. आता उद्या सायरस मिस्त्री यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. माहितीनुसार, वरळी येथील विद्युत दाहिनीत किंवा डुंगरवाडी येथील ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे सायरस मिस्त्री यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.
‘टॉवर ऑफ सायलेन्स’ हा नेमका काय प्रकार असा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर सायरस मिस्त्री हे पारशी समुदायचे आहेत. पारशी समुदाय हा अनेक दशकांपूर्वी भारतात येऊन स्थायिक झाला असला तरी त्यांनी आपली संस्कृती, धर्म आणि अन्य परंपरा कसोशीने जपल्या आहेत.
पारशी समुदायात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना दाहसंस्कार आणि मृतदेह पुरला जात नाही. पारशी समुदायाच्या परंपरेनुसार मृतदेह हा स्मशानभूमीत न नेता ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे ठेवला जातो. ही परंपरा अजूनही त्यांच्यात चालू आहे.
पारशी समुदायाच्या परंपरेनुसार मृतदेह हा स्मशानभूमीत न नेता ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे ठेवला जातो. याठिकाणी गिधाडे हा मृतदेह खातात. अलीकडच्या काळात गिधाडांची संख्या कमी झाली असली तरी पारशी समाजात आजही अंत्यसंस्काराची ही परंपरा टिकून आहे.
‘टॉवर ऑफ सायलेन्स’ हे मुंबईत मलबार हिलच्या परिसरात आहे. हे ठिकाण चारही बाजूंनी झाडांनी वेढलेले आहे. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ मध्ये एक लोखंडी दरवाजा आहे. याठिकाणी सूर्यप्रकाशात मृतदेह ठेवले जातात. त्यामुळे मृतदेहांचे विघटन वेगाने होते.
गिधाडं आणि इतर पक्षी हे मृतदेह खातात. आजही अनेक पारशी कुटुंब या पारंपरिक पद्धतीने आपल्या आप्तजनांवर अंत्यसंस्कार करतात. पारशी समुदायात मृतदेह जाळणे किंवा दफन केले जात नाहीत. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्यावर देखील त्याच पद्धतीने उद्या अंत्यसंस्कार केले जातील असे बोलले जात आहे.