Share

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एका जागेसाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला देशात मात्र जोरदार फटका

केंद्रातील सत्तारूढ भाजपला राज्यसभेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात आनंद साजरा करता आला तरी एकूण सदस्यसंख्या व कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक ते वरिष्ठ सभागृहातील बहुमत यापासून भाजप अजून दूरच आहे.

या निवडणुकीनंतर भाजपला राज्यसभेत चार जागांचा घाटाच झाल्याने पक्षाची खासदारसंख्या पुन्हा १०० च्या आत म्हणजेच ९१ वर आलेली आहे. राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने येथे विरोधकांचा जोश पाहायला मिळतो. अगदी २०१४ ते २०१९ या काळाचा विचार केला तर तसे चित्र दिसते.

२०१४ते २०१९ या काळात राज्यसभेत नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांनी एकत्र येऊन आपल्या तालावर नाचवलं. मग त्यात एखादी चर्चा आज नको, उद्या घ्या,असं विरोधकांनी ठरवलं तरी ते मोदी सरकारला करावं लागलं. साहजिकच ही बाब गुजरातेत एक तप संपूर्ण वर्चस्वाचे सरकार चालवून दिल्लीत आलेल्या मोदींना पटणारी नव्हती हे उघड आहे.

केंद्रात मोदी सरकार आले तेव्हा अगदी पहिल्याच वर्षी म्हणजे २०१४ च्या जूनमधील राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या मतदानात मोदी यांच्या डोळ्यादेखत भाजपला तांत्रिक पण मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी मागितलेल्या मतविभाजनास सरकारची तेव्हा तयारी नव्हती. पण कॉंग्रेस आणि विरोधकांनी एकत्र येऊन इतका जबरदस्त दबाव आणला की मतदान घ्यावेच लागले.

त्यानंतर, तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची राज्यसभेत एन्ट्री झाली. मात्र, राज्यसभेत होत असलेल्या गदारोळामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभागृहात केवळ अपवादात्मक स्थितीतच यायचे, हे धोरण प्रत्यक्षात आणल्याचे अनेकजण बोलतात. प्रश्नोत्तराच्या तासात तेही पूर्वार्धातच मोदी सभागृहात येतात असे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे.

आत्ता देखील भाजप राज्यसभेतील बहुमताच्या १२७ या आकड्यापासून फारच मागे असल्याची वस्तुस्थिती पुन्हा समोर आली आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात भाजपने भरघोस जागा मिळविल्या. मात्र, राजस्थानमध्ये पक्षाचे डावपेच फसले.  ज्या ५७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे २६ खासदार होते व आता निवडून आलेल्यांची संख्या २२आहे.

भाजपला चार जागांचा हा जो तोटा झाला त्यामुळे राज्यसभेतील भाजपची सदस्यसंख्या ९१ वर आली आहे. अर्थात राष्ट्रपतीनियुक्त ७ जागा अद्याप रिक्त आहेत. तेथे भाजप आपले उमेदवार आणू शकतो. मात्र, असा नियुक्त सदस्यांना निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा कमी संधी मिळत असते.

राजकारण

Join WhatsApp

Join Now