मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या १२ सप्टेंबरला रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या बिडकीन मतदारसंघात येणार आहेत. यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भुमरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि सभा सर्वांत मोठी झाली पाहिजे यासाठी ते कामाला लागले आहेत.

विविध विकासकामांचे भूमीपूजन उद्धाटन, नागरी सत्कार सोहळा व सभा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन संदीपान भुमरे यांच्यावतीने करण्यात आले आहे. पैठणमधील मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि सभा एवढी मोठी झाली पाहिजे, की त्यांनी महाराष्ट्रात आपल्या सभेचा उल्लेख केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

तसेच, जसं घरी लग्नकार्य असल्यावर आपण घरोघरी जाऊन निमंत्रण देतो, तसेच या सभेचे निमंत्रण द्या, असे आवाहन मंत्री महोदयाचे चिरंजीव विलास भुमरे हे सध्या करताना दिसत आहेत. जेवढी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी, तेवढा जास्त निधी, असा दावा देखील ते करत आहेत.

तसेच विलास भुमरे सांगत आहेत की, ढोरकीन, बिडकीनला मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे, पण तो झाल्यानंतर निघून जायचे नाही, तर पैठणला सभेसाठी यायचे. गाड्यांची व्यवस्था केली आहे, लागेल तेवढ्या गाड्या देवू, पण मुख्यमंत्र्यांच्या सभेला मोठी गर्दी जमली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांसमोर शक्तीप्रदर्शन करण्यात यशस्वी ठरलो तर भविष्यात भुमरे साहेबांना मतदारसंघासाठी आणखी निधी मिळवण्यात अडचणी येणार नाहीत, असेही विलास भुमरे यांनी यावेळी सांगितले. विलास हे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती होते. पैठणचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी एवढी तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मंत्रीपद मिळण्याआधीच अब्दुल सत्तार यांना मतदारसंघात आणून मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. पण भुमरेंना मात्र ती संधी अजून मिळाली नव्हती. नवीन सरकारमध्ये भुमरे यांना रोजगार हमी खात्याचीच जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे उशीरा का होईना पैठणमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या समक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी भुमरे पिता-पुत्रांनी सुरू केली आहे.