नुकताच गुजरात सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे, गुजरात मधील शाळांमध्ये भगवद्गीता शिकवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्यात देखील भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
आचार्य तुषार भोसले म्हणाले की, भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्याचे शिक्षण द्यावं, त्यासाठी महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा. तसेच म्हणाले, मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये.
गुजरातप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारखे संत साहित्य याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरुन महाराष्ट्रातील भावी पिढी संस्कारक्षम होईल. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचं ज्ञान मिळेल, या दृष्टीने या शिक्षणाचा शालेय शिक्षणात महत्व असल्याचे भोसले यांनी सांगितले.
गुजरात सरकारने गुरुवारी एक महत्वाचा निर्णय घेत राज्यभरातील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश केला आहे. सरकारने विधानसभेत जाहीर केले की 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता शिकवली जाईल. शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली आहे.
शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना गीतेमधील विचार आणि संस्कार शिकवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थी शाळेत गीतेमधील निवडक श्लोक नित्यपाठ म्हणून म्हणतील. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही माहिती दिली.
गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2022 दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच गुजरात सरकारने गीतेचा समावेश शिक्षणात करत असल्याची घोषणा केली. गुजरात विधानसभा निवडणूक समोर असताना भाजपने मतांसाठी ही रणनीती केली असल्याचे विरोधक बोलत आहेत.