Share

जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे ‘इंडीया ॲप’; जाणून घ्या त्याबद्दल..

फेसबुकला टक्कर देणारे जळगावच्या एका तरुणाने देशी ॲप तयार केले आहे. ‘ इंडिया बुक ‘ असे या ॲपचे नाव असून थोड्याच वेळात हे ॲप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. केवळ ३ दिवसातच १८ हजारांहून जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या एका तरुणाने हे ॲप तयार केले आहे. लक्ष्मीकांत सोनार असे या तरुणाचे नाव आहे. अगदी फेसबूकसारखेच हे ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातुन चॅटिंग, लाईव्ह कॉल, शेअरिंगद्वारे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करु शकतो. या ॲपमध्ये १० हजारांपर्यंत मित्र जोडू शकतो.

नकारात्मक असणाऱ्या पोस्टवर रिपोर्ट करु शकतो. त्यामुळे या पोस्ट आपोआप डिलीट होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या हे ॲप सुरक्षित आहे. ॲप हॅक होणे किंवा या ॲपमधून कोणताही गैरवापर होऊ शकत नाही. विशेष म्हणजे हे ॲप मोबाईलमध्ये कमी जागा घेते. त्यामुळे हे ॲप सहज वापरता येऊ शकते.

त्याचबरोबर या ॲपवर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये मायक्रो ब्लॉगिंगच्या साह्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर अधिक प्रभावीपणे व्यक्त होऊ शकता. तुम्ही तुमची जाहिरात करू शकता.त्याचबरोबर गेम्स, बिझनेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ यांसारख्या अनेक सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

देशी ॲप असल्याने हे ॲप अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. हे ॲप तुम्हीदेखील प्ले स्टोअरमधुन डाउनलोड करु शकता.अवघ्या तीन दिवसांतच तब्बल १८ हजारहून अधिक जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲपचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.

अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. परंतु हे सगळे विदेशी ॲप असल्याने आपणही देशी ॲप तयार करावे या उद्देशाने या तरुणाने हे ॲप विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे ॲप लोकांच्या पसंतीसही उतरले आहे.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now