..म्हणजे शरद पवार महाविकास आघाडीला योग्य मार्गदर्शन करत नव्हते, माजी राज्यपालांचा टोला

आटपाडमध्ये दोनदिवसीय शंकरावर खरात जन्मशताब्दी संमेलन पार पडले. यामध्ये माजी राज्यपाल राम नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महाविकास आघाडीमधील नेत्यांवर टीका केली आहे. तसेच शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

राम नाईक म्हणाले, आता पुन्हा एकदा निवडणुका घ्या असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभेचा अध्यक्ष तुम्ही निवडू शकत नव्हता असा राज्यपालांवर महाविकास आघाडी कशी काय आरोप करते? असा सवाल माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे.

तसेच म्हणाले, केवळ आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नावावर निर्णय घेतल्याचा आरोप देखील राम नाईक यांनी यावेळी केला. तसेच संभाजीनगर नामकरणावरून शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राम नाईक म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले जाणार याची आम्हाला पूर्व कल्पना नव्हती असे म्हणणे शरद पवारांना शोभणारं नाही. कॅबिनेटच्या निर्णयाची पूर्वसूचना शरद पवार यांना कोणत्याही कारणाने देण्याची गरज नाही. त्यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी त्या निर्णयाला विरोध करायला हवा होता.

शरद पवार यांचे महाविकास आघाडीला मार्गदर्शन करणारे म्हणून नाव घेतले जाते. मग मार्गदर्शन करणाऱ्याला हे सारे निर्णय घेतले जाणार हे माहीत नव्हते म्हणणे म्हणजे पवार महाविकास आघाडी सरकारला योग्य मार्गदर्शन करत नव्हते असा टोला राम नाईक यांनी लगावला.

तसेच महाविकास आघाडीत शिवसेनेची घुसमट होत होती, असा दावा देखील त्यांनी केला. म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची इतकी घुसमट होत होती की, त्यांना औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही. राजीनामा देण्याच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केलं, हा निर्णय असा घेता येत नाही असे नाईक म्हणाले.