भाजपची कार्यकारिणी काल जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत मोठ्या घोषणा देखील केल्या.
आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेनेच्या कारभारावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.
म्हणाले, मुंबई महापालिका ही आमची जहागीर आहे असं समजत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून आम्ही महापालिका काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खड्ड्यांची समस्या, त्याच त्याच कंत्राटदारांना पोसणं, कोस्टल रोडचं निकृष्ट काम असे असंख्य विषय आहेत, असे शेलार म्हणाले.
तसेच म्हणाले, आमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना संघर्ष करू शकत नाही. मुंबईत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि महापौर आमचाच बसेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. मागच्या २५ वर्षांपासून मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे.
सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे हात झटकू शकत नाही. आमचं ठरलं आहे भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायचं आहे. मुंबईकरांच्या मनात असलेलं विकासाचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचारी शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसणार अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलेल्या या आरोपांवर शिवसेना काय उत्तर देईल पाहावं लागेल.