महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता लाखो झोपडपट्टी धारकांना फायदा होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने मुंबई मधील झोपडपट्टी धारकांसाठी घेतलेला निर्णय म्हणजे, मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प SRA अंतर्गत आता शहरात कुठेही केवळ अडीच लाखात घर उपलब्ध होणार आहे. या निर्णयाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
याबाबतची घोषणा करतेवेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) बाबत आज महत्वाचा निर्णय झाला आहे. झोपडी निष्कासित झाली की 3 वर्षात विकता येणार आहे. सशुल्क घर विकत घ्यायचं असेल तर तो दर अडीच लाख रुपये ठरला आहे. त्यामुळे गरिबांना अडीच लाख रुपयात घर सहज घेता येणार आहे.’
तसेच म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधक काय बोलतात यावर मला बोलायचे नाही. मात्र एवढेच सांगू इच्छितो की,या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टी धारकांना फायदा होणार आहे.’ याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गातील सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय झाला.
दरम्यान, मुबंईत रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटिसा धाडल्या होत्या, त्यावेळी जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले होते. त्यांनी झोपड्यांवर कारवाई झाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता.
त्यांनी झोपडपट्टी धारकांची भेट घेतली होती, त्यावेळी म्हणाले होते की, झोपडपट्टी ही गरिबीची निशाणी आहे, कुणाला हौस नाही झोपड्यामध्ये राहायची. आर्थिक दुर्बलता, गावी नसलेली शेती, यांना इथे घेवून आली आहे. कोरोना काळात हाताला काम नाही, त्यात या नोटिसा दिल्यात. केंद्र सरकारने गरिबांचा विचार करावा. त्यांना न्याय द्यायचा विचार करावा ,आणि प्रश्न कायमचा सोडवावा.