Shivsena : ठाकरेंचं ‘ते’ भाषण मुस्लिम बांधवांना भावलं; अन् ईद ए मिलादच्या मिरवणुकीत चक्क शिवसेनेचं गाणं वाजलं

नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समाजाला अप्रत्यक्षपणे साद घातली होती. तसेच आमचा मुस्लीम समाजाला सरसकट विरोध नाही, हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे दिली. उद्धव ठाकरे यांनी देशासाठी शहीद झालेल्या औरंगजेब या भारतीय लष्करातील जवानाचा दाखला दिला.

तसेच देशावर जीव ओळावून टाकणारे औरंगजेब सारखे मुसलमान हे आमचे बंधू आहेत, असे वक्तव्य देखील केले. ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे, आपली कडव्या हिंदुत्त्वाची विचारसरणी बाजुला सारुन ठाकरे गटाने सर्वसमावेशतकडे वाटचाल सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

त्यात ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना घातलेली साद कितपत भावेल याबाबत साशंकताच होती. परंतु, ही शंका खोटी ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून असे दिसून येत आहे की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

कारण, जो व्हिडीओ समोर येत आहे तो मुंबईच्या भायखळा परिसरातील असून, मुस्लिम बांधवांच्या एका मिरवणुकीचा आहे, ज्यामध्ये चक्क शिवसेना- शिवसेना हे गाणं वाजताना दिसत आहे. माहितीनुसार, ईद ए मिलादच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी या परिसरात एक मिरवणूक काढली होती.

या मिरवणुकीत चक्क ‘शिवसेना-शिवसेना’ हे गाणे वाजताना दिसत होते. एवढेच नव्हे तर ईद ए मिलादच्या शोभायात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ताजियावर भगव्या रंगातील महाराष्ट्राची प्रतिमा दिसत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावर आता किमान मुंबईतील मुस्लीम मतदारांच्या मनातील शिवसेनेबाबतची प्रतिमा बदलत आहे का, अशी चर्चा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर होत आहे. तसेच आगामी काळात मुंबईतील मुस्लीम मतदार भविष्यात शिवसेनेच्या पाठिशी उभा राहू शकतो का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.