Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा

काल झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी घटना घडली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी काल शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर स्मिता ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आता थेट राजकीय व्यासपीठावर स्मिता ठाकरे आल्यामुळे शिंदे यांनी खेळी केली असं बोललं जात आहे. एवढेच नाही तर स्मिता ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटाबाबत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.

स्मिता ठाकरे म्हणाल्या की , ‘मी इथं आले आणि मला इथं सगळे जुने चेहरे दिसत आहेत. त्यांना पाहून मला आनंद झाला आहे. एकनाथ शिंदेंना ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. दुसऱ्या मेळाव्याचं आम्हाला काही माहिती नाही. आम्ही इथं आहोत, त्यामुळे इथं काय होईल यातच आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे’.

तसेच म्हणाल्या, एकनाथ शिंदेंच्या भाषणानंतर आणखी काही जण त्यांना साथ देतील, अशी आशा आहे. जनतेच्या समस्या आणि गाऱ्हाणी ऐकून घेण्याची एकनाथ शिंदे यांची जी पद्धत आहे, त्यामुळेच लोक आकृष्ट होऊन साथ देतात, असेही स्मिता ठाकरे यावेळी म्हणाल्या.

स्मिता ठाकरे यांची शिंदेंच्या मेळाव्यात हजेरी ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी धक्का देणारी बाब असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. स्मिता ठाकरे यांच्याबद्दल माहिती म्हणजे, स्मिता ठाकरे या उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांच्या घटस्फोटित पत्नी आहेत. शिवाय काही वर्षांपूर्वी त्यांना थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिलं गेलं होतं.

स्मिता ठाकरे यांचे नाव अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या चित्रपट सृष्टीत कायम वजन राखून राहिलं. चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. आजही काहीना काही निमित्ताने स्मिता ठाकरे या चर्चेत असतात. त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी १९८७ साली विवाह झाला होता.

.