Share

भाजपला सत्तेबाहेर काढणाऱ्या नितीश-तेजस्वींना ठाकरेंचा फोन, म्हणाले, आज त्यांच्याशी..

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर जडयू आणि राजद यांच्यासह मित्र पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली.

नितीश कुमार यांनी भाजपचा जडयूला फोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपनेच शिवसेना फोडल्याचा आरोप करण्यात येत होता. याशिवाय भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्ष करत आहेत.

बिहारमधील या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी फोन करून नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी फोनवर झालेल्या या चर्चेबद्दल ट्विट करून सांगितले आहे. त्यांनी ट्विट केले की, बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!

शिवसेना आणि जडयू हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये कार्यरत होते. शिवसेना आणि जडयूनं भाजपची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. शिवसेनेनं २०१९ मध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि भाजप जडयू फोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत जडयूनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात शिवसेनेनं आम्हाला धोका दिला त्यामुळं आम्ही त्यांचा पक्ष फोडला, असं केंद्रीय मंत्री सुशील मोदी म्हणाले. शिवसेनेसोबत जे घडलं ते जडयूसोबत घडेल, असा इशारा देखील सुशील मोदी यांनी दिला होता. शिवसेना आणि जडयू आता भाजप विरोधात आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now