शिवसेना कोणाची यावरून सध्या शिंदे- ठाकरे गटात संघर्षाची लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून दबावतंत्र अवलंबले जात आहे. असे असताना आता ठाकरे गटालाही आक्रमक अशा चेहऱ्याची गरज असून, तेजस ठाकरे यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांची एन्ट्री झाली आहे. यावरून आता बाळासाहेबांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. आदित्य ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी तेजस ठाकरे यांच्याबाबत देखील एक वक्तव्य केले होते.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘आदित्य हा शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. पण तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याची सेना ही तोडफोड सेना असेल’. बाळासाहेबांनी तेजस बाबत केलेल्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते त्याप्रमाणे आता ठाकरे गटात तेजस यांची एन्ट्री होऊन सेनेला मोठे बळ मिळेल, अशी चर्चा आहे. तसेच सेनेला पुन्हा एकदा उभे करण्यासाठी तेजस ठाकरे यासारख्या आक्रमक चेहऱ्याची गरज सध्या ठाकरे गटाला आहे, त्यामुळेच ठाकरे आपला हा हुकमी एक्का बाहेर काढणार याची चर्चा आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्याला आपली ताकद दाखविण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्ताने दोन्ही गटाकडून शहरात बॅनर लावत शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी डोंबिवली स्टेशन परिसरात दसरा मेळाव्याचा बॅनर लावला.
स्टेशन परिसरातील या बॅनरवर ठाकरे घराण्यातील बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य यांसह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यामुळे दसरा मेळाव्याला तेजस राजकारणात अधिकृत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.