एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, आणि शिंदे यांनी भाजपसोबत युती करून नवीन सरकार स्थापन केलं. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटाकडून उद्धव ठाकरेंच्या प्रती सौम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा अनेक घटना घडत आहेत ज्यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे.
सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांकडूनही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका झालेली नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थोडी नरमाईची भूमिका दिसत आहे. बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या प्रती सौम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लागू नये, अशी इच्छा होती, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आधीपासूनच सांगत होते. मात्र या दोन्ही गटांमध्ये संजय राऊत यांच्यावरुन वाद वाद आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर राऊत यांनी बंडानंतर जोरदार टीका केली आहे.
त्यामुळे आता बंडखोर आमदार मतदारसंघात परतल्यानंतर संजय राऊत यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. संजय राऊत हे शरद पवार यांचे एजंट असल्याची टीका करत , राऊत शिवसेना संपवायला निघाले आहेत अशी टीका सातत्याने या आमदारांकडून करण्यात येते आहे.
मात्र, उद्धव आणि आदित्य ठाकरेंबाबत आदरामुळे शिंदे गटातील आमदार टीका करताना दिसत नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे.
नुकतेच संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर जाणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की, उद्धव ठाकरेंना आमची भूमिका आवडली नसेल, एक दोन महिन्यात, सहा महिन्यांत त्यांना ती पटेल, जेव्हाही मातोश्रीचे दरवाजे उघडतील तेव्हा आम्ही उद्धव यांच्याकडे नक्की जाऊ असे म्हणाले आहेत.
तसेच दीपक केसरकर यांना देखील उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर जाणार का, असा प्रश्न केला होता. त्यावर ते बोलले की, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर नक्कीच मातोश्रीवर जाऊ, पण आम्ही थेट उद्धव ठाकरेंशीच बोलू असे ते म्हणाले आहेत. पुन्हा एकत्र यायचं असेल तर आता आमच्या कुटुंबात भाजपाही आहे, त्यांच्याशी बोलून निर्णय करु असे म्हणाले.
त्यामुळे आता या दोन आमदारांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का, या चर्चांना जोर मिळाला आहे. तर दुसरीकडे तह करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेते आणि खासदारांकडूनही होत असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या बैठकीत एका वरिष्ठ नेत्याने पक्षाच्या हितासाठी एकनाथ शिंदेंसोबत तह करावा असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती आहे.