Share

Eknath Shinde: दिल्लीतील शहा–शिंदे भेटीत उलगडला ‘ठाकरे प्लान’चा गुंता? कोण कोणाचा डाव उधळतंय, पडद्यामागील हालचालींनी वाढली उत्सुकता

Eknath Shinde: महायुतीमध्ये वाढणाऱ्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. जवळपास पन्नास मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर राज्यांच्या नेत्यांना इतका वेळ देत नाहीत, मात्र शिंदे यांना शहा वेळ देतात, यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.

शिंदे–शहांचा प्लान कोणाच्या विरोधात?

महायुतीच्या पद्धतीनुसार निवडणुकांचे नियोजन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पाहतील आणि प्रचाराची धुरा हातात राज ठाकरे (Raj Thackeray) घेतील, अशी योजना तयार करण्यात आली होती. मात्र ही माहिती राज्यातील एका प्रभावी नेत्याला लगेच मिळाली. शिंदे–राज जवळ आल्यास आपले गणित बिघडेल, असा संकेत मिळताच या नेत्याने दिल्ली आणि मुंबई या दोन्हीकडे हालचालींना वेग दिला. एप्रिल २०२५ मध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर या ‘कोल्ड वॉर’ला आणखी उधाण आले.

बदललेली समीकरणे आणि वेगवान हालचाली

भाजपमध्ये मजबूत पकड असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने स्वतः पुढाकार घेऊन राज ठाकरे यांच्याशी संवाद वाढवला. त्यांनी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळ जावेत आणि शिंदेंपासून दूर रहावेत, याची काळजीपूर्वक मांडणी केली. याच दरम्यान शिक्षण विभागाकडून हिंदी अनिवार्य करण्याबाबतचा जीआर जाहीर झाला. हा निर्णय शिंदे सरकारातीलच एका मंत्र्याच्या खात्यातून निघाल्याने राज ठाकरे यांनी यावरून थेट महायुतीवर निशाणा साधला. या मुद्द्यावरून ते आपोआप उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले आणि शिंदे गटापासून दूर झाले.

दिल्लीतील भेटीचा खरा संदर्भ – फसलेला ‘ठाकरे प्लान’?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील काही माजी नगरसेवकांना आपल्याकडे ओढले. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदेंनी दिल्लीत जाऊन शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली. पण चर्चेचा मुख्य मुद्दा होता. महापालिका निवडणुकांसाठी आखलेला ‘ठाकरे प्लान’ पूर्णपणे कोसळल्याची चर्चा. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांची युती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असून जागावाटपाची चर्चा देखील सुरू आहे. ही परिस्थिती शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरली.

“मोठ्या नेत्याला लक्ष्य करण्यासाठी हालचाली?

दिल्लीतील चर्चांमध्ये असेही बोलले जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उत्तराधिकारी चर्चेत अमित शहा (Amit Shah) यांचे नाव वरचेवर घेतले जाते. संघाच्या पूर्ण पाठिंब्याने आणखी एक प्रमुख नेता यात आघाडीवर असल्याची चर्चा होते. या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी काही गट प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व हालचालींच्या केंद्रस्थानी मुंबईतील उलथापालथ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर झालेली दिल्लीतील भेट अधिकच महत्त्वाची ठरली आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now