Thackeray Brothers vs BJP: मराठीच्या मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. या राजकीय जवळीकीचे पडसाद महायुतीच्या गोटात उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत थेट खुले आव्हान दिलं आहे.
प्रसाद लाड म्हणाले…
विधिमंडळाच्या परिसरात सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना, प्रसाद लाड म्हणाले, “दोन भाऊ काय, चार भाऊ, पुतणे, भाचे सगळे एकत्र आले तरी आम्ही तयार आहोत. होऊ द्या महासंग्राम.” त्यांनी सांगितले की ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन जनतेसमोर यावे आणि थेट लढाई करावी.
प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही टीका करत म्हटलं की, “उद्धव ठाकरे मराठीबद्दल कमी आणि ‘गद्दार’, ‘धोका’, ‘खंजीर’ यांसारखे नकारात्मक शब्द जास्त बोलले. यामुळे त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो.”
ते पुढे म्हणाले, “भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही सर्व स्तरांवर लढायला तयार आहोत. पण उद्धव ठाकरे यांनी पूर्वी राज ठाकरे यांचा जाहीरपणे अपमान केला होता. आज तेच राज ठाकरे यांच्यासोबत चालत आहेत. मग त्यांनी आधी राज यांची माफी मागितली पाहिजे का? हा सवाल उपस्थित होतो.”
त्याचबरोबर, मराठीचा अभिमान सगळ्यांनाच आहे, हे मान्य करत लाड म्हणाले, “मराठी बोलणं गरजेचं आहे, पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मारहाण करणं, हिंदी भाषिकांना बोलण्यासाठी दडपशाही करणं हे चूक आहे.”
आशिष शेलार यांचीही ठाकरे बंधूंवर टीका
भाजपचे मुंबई (Mumbai) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील ठाकरे बंधूंवर घणाघात केला आहे. ते म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रामाणिकपणा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात तडफड दिसत होती.”
शेलार यांनी टोला लगावत सांगितले की, “राज ठाकरेंना जर रस्त्यावरचं राजकारण करायचं असेल, तर त्यांनी तिथे गोट्या खेळाव्यात.” तसेच, “दोघांनीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानायला हवे होते,” असंही ते म्हणाले.