केंद्रीय मंत्री अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मू काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाली आहे. त्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. हेमंत लोहिया यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांचा नोकर बेपत्ता आहे, त्यामुळे त्याच्यावर खुनाचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नोकराचा शोधही सुरू करण्यात आला आहे. हेमंत हे जम्मूच्या बाहेरील उदयवाला इथे राहत होते. या ठिकाणी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचंही आढळून आलं आहे. त्यांचा पाय सुजला होता. आरोपीने लोहिया यांना गुदमरून मारलं, त्यानंतर सॉसच्या बाटलीच्या काचेने त्यांचा गळा चिरला आणि मग त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हेमंत लोहिया यांची हत्या का आणि कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी एचके लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी जम्मू आणि तुरुंग विभागाचे नवे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मूमध्ये पोहोचले असताना हा सर्व प्रकार झाला. या घटनेनंतर सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे अमित शहांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.