शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; भूस्खलनाने तब्बल ३० एकर भातशेती डोळ्यांदेखत जमिनीत गाडली गेली

सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच पाऊस जुन्नर तालुक्यात देखील पडला असून, भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनाने जवळपास २५ ते ३० एकर भातशेती गाडली गेली आहे.

जिथे हे भयानक भूस्खलन झालं आहे, ते जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील ठिकाण आहे. तळेरान हा आदिवासी पट्ट्यातील भाग आहे. संततधार सुरू असल्याने या भागातील शेतकरी भाताची लावणी करतात. मात्र सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

अचानक भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांनी लावलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३० एकरहुन अधिक भात शेती या भूस्खलनाखाली गाडली गेली आहे. तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सध्या घटनास्थळाची पाहणी करत पंचनामे करण्याचे काम सुरू केलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी तळेरान येथील भूस्खलनामुळे भातशेती गाडली जाऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबत त्वरीत आदेश दिले आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी संकटात आले आहेत.

दरम्यान, काल महाबळेश्वर येथे ५४, तर नागपूर येथे ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू येथे ५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. घाट परिसरात दुपारपर्यंत ५० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तीन दिवसांमधील पावसामुळे राज्यातील काही नद्या इशारा पातळीच्या वर, तर काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत होत्या.

सध्या, हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये तुफान पाऊस सुरू असून ओढ्या नाल्यांना पुर आला आहे. नुकतेच कठडे नसलेल्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती पाण्यासोबत वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे.