प्रामुख्याने राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादीदेखील चांगलीच आक्रमक झाली असून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. काल जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.
रोहित पवार म्हणाले, काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केलं जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच आगामी पालिका निवडणुकीबाबत देखील रोहित पवार यांनी भाष्य केलं.
दरम्यान, मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला. तर दुसरीकडे रोहित पवारांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रोहित पवारांनी आदित्य यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईन, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.