आज आंबेडकर चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री वरती शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात बंडखोर नेत्यांवर टीका केली. आणि शिवसेनेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या विविध भागातील मुस्लीम जनसमुदायाच्या मनातील भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या. त्यानंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या हस्ते सुषमा अंधारे यांनी हातात शिवबंधन बांधून घेतले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, धुळे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी मला फोन करून उद्धव ठाकरेंना संदेश देण्यास सांगितला होता. धुळ्याचे शकील बागवान यांचा संदेश आहे की, ताई हमारा पैगाम देना, हम धुलीयासे है. तमाम मुस्लीम कौम आपके साथ है. हम भाजप का दट कर सामना करेंगे, बागवान यांचा हा संदेश त्यांनी ठाकरेंना दिला.
सुषमा यांनी शिवबंधन बांधल्यानंतर भाषण केले. म्हणाल्या, माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फाईलचं ओझं आहे ना माझ्यासमोर कोणतही प्रलोभन नाही. मी शिवसेनेत कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही. त्याऐवजी मी राज्यातील प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातील बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेन.
मला अजूनही शिवसेनेतील पीठा-मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत, येथील पद्धती माहिती नाहीत. त्यामुळे मला सांभाळून घ्या. निलमताई गोऱ्हे या मला आईप्रमाणे सांभाळून घेणाऱ्या आहेत. तर सचिन अहिर यांच्या रुपाने माहेरचा माणूस माझ्यासोबत आहे. अशा सुषमा अंधारे म्हणाल्या.
तसेच पुढे म्हणाल्या, मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही. मी पूर्वी शिवसेनेवर जरूर टीका केल्या आहेत,पण आता सर्व गोष्टी क्लिअर आहेत असे सुषमा अंधारे म्हणाल्या.