health : आपल्याला आजपास पाहायला मिळते की, थंडी, ताप असेल. थोडे दुखणे असेल, अशक्तपणा आला असेल, तर डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून वेदनाशामक गोळी (पेइन किलर) घेतली जाते. मात्र वेदनाशामक गोळी सतत खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात व किडनीला त्याचा त्रास संभवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सतत वेदनाशामक गोळीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे नक्की आपल्याला काय आजार झाला आहे? अथवा आपले काय दुखत आहे? त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
वेदनाशामक गोळी आजार बरा करत नाही. एखादा अवयव दुखू लागला की तेथून रासायनांच्या माध्यमातून मेंदूला संदेश पाठवले जातात. वेदनाशामक गोळी मेंदूकडून येणारे व तिथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करते. त्यामुळे वेदना झाल्याचे आपल्या लक्षात येत नाही.
आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न होणाऱ्या रासायनांवर नियंत्रण ठेवले जाते. वेदनाशामक गोळ्यांचा फायदा होतो. मात्र त्यामुळे शरीराला गंभीर आजार निर्माण होत असल्याची माहिती मूत्रपिंड विकार तज्ञ डॉ.गौरव राणावत यांनी दिली.
काही वेळा रुग्णांना एखाद्या गोळीनेही त्रास होतो. ॲस्पिरिनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्त्राव होतो. दुखण्यावर दिली जाणारी गोळी ‘कॉक्स टू इन्हीबीटर’ मुळे मोठ्या आतड्याचा अल्सर झालेले रुग्ण उपचारासाठी येतात, अशी माहिती मूत्रपिंड विकाराचे तज्ञ डॉ. केनी यांनी दिली.
त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक ठरणाऱ्या वेदनाशामक गोळ्या सतत खाणे टाळले पाहिजे. घरगुती नैसर्गिक उपाय करणे साहजिक आहे. मात्र अधिक वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच उपचार सुरू करावेत. वेदनाशामक गोळ्यांनी तात्पुरते बरे वाटेल, मात्र शरीराची मोठी हानी होणे त्यामुळे संभवते.