भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा उद्या म्हणजेच २६ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या निवृत्तीच्या एकदिवस आधी ते देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा तीन खटल्यांची सुनावणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. या तीन प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
एन व्ही रमणा हे पेगासस, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका, PMLA निकालाविरूद्ध पुनरावलोकन यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांवर निवृत्तीपूर्वी रमना नेमका काय निकाल देणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले आहे.
माहितीनुसार, पेगासस हेरगिरी प्रकरणफोन हॅक करून भारतातील राजकारणी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करणाऱ्या पेगासस हेरगिरी प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या भारत-इस्रायल संरक्षण करारावेळी भारताने पेगाससची खरेदी केल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले होते.
मोदी सरकारनं २०१७ साली संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहे. पीएमएलए कायद्यावरील सुनावणीयाशिवाय आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर पीएमएलए कायद्यावर सुनावणी होणार आहे.
नुकतेच २७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील ईडीला अटक, छापा, समन्स, निवेदन यासह दिलेले सर्व अधिकार कायम ठेवले होते. पीएमएल कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या तब्बल २५० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
त्या सर्वांवर एकत्रित सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. २७ जुलैला सुनावण्यात आलेला निकाल संविधानाच्या कलम २० आणि २१ द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत संरक्षणांच्या विरोधात असल्याचे याचिकेत दावा करण्यात आला आहे.
गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची नुकतीच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णया विरोधात बिल्किन्स बानो यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे.