Suryakumar Yadav: भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा टी-20 सामना मुल्लानपूर येथे झाला आणि या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचे प्रचंड लक्ष भारतासमोर ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया केवळ 162 धावांवर सर्वबाद झाली. पराभवानंतर सूर्या स्पष्टपणे नाराज दिसत होता.
कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सामन्यानंतर सूर्या म्हणाला की, “प्रत्यक्षात आपण आधी फलंदाजी केली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. गोलंदाजांकडून आपल्याला हवे तसे प्रदर्शन झाले नाही. नंतर मात्र जाणवले की या पिचवर योग्य लेंथ राखून गोलंदाजी करणे अत्यंत महत्त्वाचे होते. हा नक्कीच शिकण्याचा टप्पा आहे आणि चुका दुरुस्त करणे हाच पुढचा मार्ग आहे.”
मुल्लानपूरच्या मैदानावर दव पडल्याने गोलंदाजांना विशेषतः त्रास झाला. याबाबत सूर्या म्हणाला की, “थोडीफार दव होती. आमच्या योजनेप्रमाणे गोष्टी घडत नव्हत्या तेव्हा पर्यायी योजना स्वीकारायला हवी होती, पण तशी प्रतिक्रिया देता आली नाही. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने बॉलिंग केली, त्यातून आम्हाला बरेच शिकता आले. पुढच्या सामन्यात ते लागू करण्याचा प्रयत्न करू.”
शुभमन गिलचा उल्लेख करताना सूर्या नाराज
वरच्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, “शुभमन आणि मी चांगली सुरुवात केली असती तर संघाला मोठा फायदा झाला असता. आपण प्रत्येकवेळी अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. तो चांगला खेळतो, परंतु प्रत्येकाचीच एखादी वाईट इनिंग असते. शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तरी मला जबाबदारी घ्यायला हवी होती. तसे झाले असते तर धावांचा पाठलाग सोपा झाला असता.” सूर्याने हेही स्पष्ट केले की या चुका लक्षात ठेवून पुढच्या सामन्यात टीम इंडिया अधिक सक्षम प्रदर्शन करेल.






