“सिल्वर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ जणींना भेटून त्यांच्या वेदना जाणायच्या आहेत” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला आक्रोश व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे अशा तणावपूर्ण स्थितीत आंदोलकांच्या समोर आल्या होत्या.

मात्र आंदोलक बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुन्हा माघारी जावे लागले. मात्र या घटनेला बरेच दिवस उलटून गेले असताना देखील सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या २२ महिलांची भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या वेदना जाणून मार्ग काढणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सुळेंनी म्हटले आहे.

सोलापूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “अशा स्वरूपाचे आंदोलन अथवा हल्ला यापूर्वी कधी झाला नव्हता. कदाचित आंदोलनाची ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. पण कुणी भडकवले ते पाहावे लागेल. या आंदोलनाच्या निमित्ताने ज्या २२ जणींनी आपला आक्रोश व्यक्त केला, त्यांना भेटायचे असून, त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत” अशी इच्छा सुळेंनी व्यक्त केली आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासंदर्भात भाजप नेते नारायण राणे यांनी नवीन तारीख दिली आहे. यावर बोलताना, “तारीख पे तारीख हे सिनेमात छान वाटते. तो सिनेमा आणि हे वास्तव आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी आहे. मी सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. सत्ता येते आणि जाते. ती कोणाची पर्मनंट नसते. सत्ता असतानाही लोकांची सेवा करता येते आणि सत्ता नसतानाही लोकांची सेवा करता येते.” असे सुळेंनी म्हणले आहे.

याचबरोबर, मनसे नेते राज ठाकरेंवर टीका करत “आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. अशा परिस्थितीत समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वत: काहीही कामे करीत नाहीत. केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा. त्यावर काहीही हावभाव नसतात,” असा टोला सुळेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक; आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
विराट कोहलीला मिळणार संघातून डच्चू? सततच्या खराब फाॅर्ममुळे पहील्यांदाच आली ही वेळ
भक्तगणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारणार भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर
‘देशातील वाढत्या महागाईवर पंतप्रधान मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे’