राज ठाकरेंच्या या व्यक्तव्यानंतर आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे राज यांच्या या भूमिकेनंतर मुस्लिम समाज नाराज झाला आहे. तसेच ठाकरे सरकारमधील नेते मंडळीदेखील राज यांचा खरपूस समाचार घेत आहेत. यामुळे आता राजकारण चांगलच तापलं आहे.
अशातच आता मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राज यांच्यावर हल्लाबोल चढवताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे. ‘भोंग्या’ मागचा खरा ‘ढोंग्या’ नागपूरचा असल्याचा टोला शेळके यांनी लगावला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शेळके म्हणाले, ‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय राज ठाकरे तापवत असले तरी त्यामागील खरे सूत्रधार फडणवीस आहेत, असं त्यांनी म्हंटलं आहे. तसेच फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत का निर्णय घेतला नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच ‘मशिदींवरील भोंग्यांचा विषय तापवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा कावा आहे, असे म्हणत शेळके यांनी विरोधकांना लक्ष केलं. दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सुरु असलेला हा सर्व खटाटोप असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महागाई, रोजगार, विकास यावर न बोलता समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा गोष्टींना खतपाणी देण्याचे काम सुरु आहे. परंतु राज्यातील जनता धार्मिक तेढ वाढविण्याच्या कारस्थानांना यशस्वी होऊ देणार नाही, असंही शेळके म्हणाले.