पुणे जिल्ह्यातील नवनिर्मित श्री क्षेत्र देहू नगरपंचायत येथून भाजपला हादरा बसवणारी एक बातमी समोर येत आहे. देहू नगरपंचायतीतील भाजपच्या पहिल्या आणि एकमेव नगरसेविका पूजा काळोखे यांनी काल म्हणजेच गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काल राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या आढावा बैठकीत वडगाव मावळमध्ये काळोखे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. पूजा काळोखे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आता देहू नगरपंचायतीत फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचेच नगरसेवक असणार आहेत.
राष्ट्रवादीत प्रवेश करताना पूजा काळोखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला सांभाळून घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आमदार सुनील शेळके यांनी मोठ्या भावासारखे आपल्या पाठीशी उभे राहावे अशी इच्छा देखील व्यक्त केली. दमदार आमदार असलेल्या अण्णांच्या कामाने प्रभावित होऊनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे पूजा काळोखे यांनी सांगितले.
पूजा काळोखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आता देहूत भाजपचे घरच रिकामे झाले असेच म्हणता येईल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणचे 17-0 असे निर्विवाद बहुमत झाले आहे. त्यामुळे आता देहूत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नक्कीच वाढली आहे.
दरम्यान, देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झालेल्या देहूत जानेवारीत निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीला बहूमत मिळाले. त्यांचे 14, दोन अपक्ष आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला. नंतर दोन्ही अपक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता.
काल भाजपच्या काळोखे या राष्ट्रवादीत आल्याने देहूत राष्ट्रवादीचे बळ 17-0 असे झाले. पहिल्याच देहू नगरपंचायतीत महिलाराज अवतरलेले आहे. 17 पैकी 11 नगरसेवक महिला आहेत. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदही महिला सांभाळत आहेत. काळोखे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.